Saturday 20 June 2015

पावसाळा......

                             पावसाळा......

 पावसाळा नेहमीच मला गत स्मृतींमध्ये घेऊन जातो. सोसाट्याचा वारा आणि गर्ज्त येणारे काळे ढग, विजांचा चकचकाट आणि मग कोसळणारा पाऊस .कोकणातला पाऊस असाच यायचा. यायचा असा की, थांबायचं नाव घेत नसे. त्या पावसात मग सगळेच चिंब होवून जात. आहोळ, नद्या-नाले ओसंडून वाहू लागत. ’व्हाळाक पूर इलो ….., बघूक येतस?’ अस विचारत मित्र यायचे आणि पाऊलं आपसूकच  तिकड वळायची. झऱ्याचंच साम्राज्य पसरयला लागायचं. घरासमोरच्या विहीर तुडूंब भरु वाहू लागे. एकदा का हा पाऊस सुरु झाला की मग पुढ्चे  चार महिने अगदी दीवाळी पर्यंत विहीर वाहतच असे.
   आभाळ दाटून येई तसा पाऊसही दाट पडायचा.चार चार दिवस अविश्रांत पडयचा. शेतकरी आणि  शाळेतली आम्ही मुलं सगळेचं पावसात चिंब होत असू. मुलांजवळ छत्री असूनही तो पाऊस छ्त्रीला जुमानणारा नव्हता. शेतकऱ्याच्या डोक्यावर मात्र खोळ किंवाइरलं’( पानं आणि बाबूंपासून बनवलेल ) असायचं. आमच्या शाळेच्या वाटेवर चार आहोळ होते. ते पार करुन शाळेत जाणं म्हणजे काही वेळा खुप कठीण व्हायचं. आहोळावर असणाऱ्या साकवांना खालून रोरावत येणारं पाणी वाकुल्या दाखवत स्पर्श करायचं तेव्हा त्या साकावावर पाय ठेवायला धजावत नसे. रामेश्वराच्या देवळाजवळ्च्या आहोळाजवळ शांताराम राहयचा.अशा प्रसंगी तोच आम्हाला हाताला धरुन साकव पार करुन दयायचा. पुढे मग वाटभर पायाने पाणी उडवत, खेळत आम्ही शाळा गाठत असू.
पहिल्याच पावसात जमिन हिरवीगार होवून जात असे. झाडाखाली तशाच पडून असणाऱ्या काजूच्या बियांना मग कोंब येत असत. डाब थोडा बाहेर आल्यावर ते खायला फार मजा येत असे. शेवरी, अळंबी, तेरं, घोटाचे वेल, खडपं अळू, सुरण अशा रान भाज्या तरारुन वर येत. फणसाच्या घोट्या घालून आई त्याची सुरेख भाजी बनवायची. रानातल्या  इतर फळांचा सुकाळ संपला तरी पावसाळ्यात पेरुला लाल लाल पेरु लागायचे. बावल्याखडपात बांदीवर एक जगमाचं झाड होत. त्याला लागलेली जगमं काटे वाचवून काढावी लागत. घशाकडॆ जरा खेपणारी हे जगमं हातात वाटॊळी घालून फिरवून मऊ करायची आणि मग खायची. थोड्याच दिवसात भिरमोळ्याचे वेल वर झाडावर उंच चढायचे. मोठ्या झालेल्या वेलांचा अंदाज घेवून तो जमिनीतून काढ्ला की, खाली असलेला कंद सोलून खायला मिळे. पावसाळाच्या अर्ध्यावर आल्या की, कोवळ्या चिंचा आणि तोरंजन असा आबंट मेवा आमच्यासाठी तयार असायचा. जाता जाता वाटेतच मिळणार किती हे धन? तिथली जमीन आमच्यासाठी अन्नपूर्णा असायची.
                        किती पडतो पाउस
                        थेंबा थेंबाचा नगारा
                         कसा घेवू, कुठे ठेवू
                         त्याचा अफाट पसारा
किती पडतो पाऊस
                                झाडां पेडांचा आसरा
                                मुंग्या वारुळाच्यामध्ये

                                वर अळंब्याच्या गारा
                           किती पडतो पाऊस
                           शेत, रान झालं चिंब
                           वर फुटलासे पान्हा
                           आड गेले सुर्यबिंब
                                   किती पडतो पाऊस
                                   रानवेली झाल्या मत्त
      दूर वाजतसे पावा
         झाले चित्त प्रफुल्लीत


पावसाळ्यात शाळेला अचानक सुट्टी मिळायची, कधी कधी मग शाळा सुद्धा पावशाळा होऊन जायची. शाळेत गेल्या गेल्या एखादा दुसरा तास घेऊन शाळा सोडली जायची. श्रावण सोमवारी शाळा अर्धा दिवस असायची. 

No comments:

Post a Comment